राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांसाठी दौंडमध्ये रास्ता रोको आंदोलन

दौंड : बहुजन मुक्ती पार्टी तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्यावतीने एस.टी.कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे व इतर मौलिक मागण्यांसाठी दौंड मधील गोल राऊंड चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात बोलताना ते म्हणाले की, बहुजन मुक्ती पार्टी ने दिलेला पाठिंबा हा केवळ औपचारिक किंवा कागदावरचा नसून संपूर्ण ताकदीनिशी म्हणजेच तन-मन-धनाने तसेच शासकीय प्रशासकीय व न्यायालयीन लढा अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई चालूच राहील. तसेच या आंदोलनाला दुसरे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय प्रचारक कुमार काळे हेही उपस्थित होते.

त्यांनी आपल्या भाषणात बहुजनांची या देशातील एकमेव ट्रेड युनियन असून युनियन बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने राष्ट्रीय पातळीवर संघर्ष करीत असून त्यांच्या माध्यमातून अनेक शासकीय व अशासकीय असंघटित कामगारांचे लाखो कामगारांना आपल्या मौलिक अधिकारसाठी न्याय मिळवून दिलेला आहे. चिंताग्रस्त झालेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना देखील अशाच प्रकारे न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा होवाळ यांनी सांगितले की, शासनाने लवकरात लवकर एसटी महामंडळाचे राज्य शासना मध्ये विलीनीकरण करून आत्महत्या ग्रस्त कामगारांच्या घरच्यांना १ कोटी रू. नुकसान भरपाई व तसेच कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घ्यावे. या मागण्या राज्य शासनाने जर मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्र बंद केला जाईल असा इशारा दिला.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हाध्यक्ष गोरक्ष सावता बारवकर, तालुका अध्यक्ष गोरख फुलारी, युवा तालुकाध्यक्ष लखन जाधव, युवा उपाध्यक्ष रामदास बारवकर, दौंड शहर प्रभारी मनोहर कोकरे, दौंड शहर अध्यक्ष नितीन डाळिंबे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुनिता अडसूळ, भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा महासचिव निलेश बनकर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे रामचंद्र भागवत (पुणे जिल्हाध्यक्ष,) राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या पुष्पा बनकर, पूजा मोरे, छत्रपती क्रांती सेनेचे अशोक मोरे आदि कार्यकर्ते या प्रसंगी आंदोलनात सहभागी झाले होते.