दौंड मधील राज्य राखीव पोलीस दलाच्या मुख्यालया समोरच पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू, गोल राऊंड ते बोरावके नगर रस्ता बनला मृत्यूचा सापळा!

दौंड : राज्य राखीव पोलीस दलाच्या (गट क्र.5) मुख्यालया समोरील रस्त्यावर एका राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनाने चिरडल्या ची घटना घडली. राजेंद्र शंकर राक्षे(वय 55,रा. दत्त अपार्टमेंट,दत्तनगर,गोपाळवाडी) असे अपघातामध्ये जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बाबूजी नावाने परिचित असलेले राक्षे यांनी सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली. येथील गोल राऊंड ते बोरावके नगर रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे, हा रस्ता जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक देत आहेत.
अपघाता बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.12 फेब्रु. स.6.15 वा.दरम्यान राजेंद्र राक्षे, गोल राऊंड रस्त्याने बोरावके नगर च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने( मनमाड -बेळगाव राज्य मार्ग) पायी जात असताना पाठी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना उडविले, मुख्यालयावर कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी, येथील योगा ग्रुप चे सचिन कुलथे व सहकारी यांना राक्षे हे रस्त्यावर निपचित पडले असल्याचे दिसले म्हणून त्यांनी तेथे धाव घेतली.दरम्यान पोलिसांना ही अपघाताची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशन चे पो कर्मचारी घटना स्थळी पोहोचले, सर्वांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, परंतु त्यांचा आधीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
राज्य राखीव पोलीस दलाच्या हद्दीतून मनमाड- बेळगाव राज्य मार्ग जातो. या रस्त्यालगतच राज्य राखीव पोलीस दल गट क्र.5 व 7 या दोन्ही गटाच्या मुख्यालयाचे कार्यालय आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहतहि याच रस्त्याला लागूनच आहे. परंतु तरीही या ठिकाणी सेवा मार्गाचे काम करण्यात आलेले नाही, त्या मुळे सर्व पो. कर्मचारी व अधिकारी, त्यांचे कुटुंबीय यांना या मुख्य रस्त्याचाच वापर करावा लागतो आहे.या रस्त्या वरून जड वाहनांच्या वाहतुकीचे प्रमाण ही जास्त आहे. तसेच ही वाहने प्रचंड वेगाने जात असतात. ज्या मुळे या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परिसरातील हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे, अजून कीती जीव गेल्या नंतर प्रशासनाला जाग येणार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत.