अख्तर काझी
दौंड : दौंड शहरामध्ये एका राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) जवानाने रिव्हॉल्वर मधून बेछुट गोळीबार करीत तिघांची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना दिनांक 16 जानेवारी 2018 रोजी घडली होती. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या तिहेरी हत्या प्रकरणातील आरोपी संजय बळीराम शिंदे (वय 39,रा. अथर्व हाईट्स, गोपाळवाडी रोड दौंड) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व 2 लाख रुपये दंड तसेच कलम 409 अंतर्गत 10 वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी शिंदे याच्या गोळीबारात गोपाळ काळूराम शिंदे, परशुराम गुरुनाथ पवार व अनिल विलास जाधव (तिघेही राहणार दौंड) यांचा मृत्यू झाला होता.
सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 16 जानेवारी 2018 रोजी आरोपी संजय शिंदे याने पैशाच्या वादातून येथील नगरमोरी चौक परिसरामध्ये गोपाळ शिंदे व पवार या दोघांची रिवाल्वर मधून गोळीबार करीत हत्या केली होती. नंतर शिंदे याने बोरावकेनगर येथे जाऊन अनिल जाधव यांची जुन्या वादातील रागातून हत्या केली. तिहेरी हत्याकांड करून तो फरार झाला होता. दौंड पोलीस व पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक त्याचा तपास करीत होते.
तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर (तपास अधिकारी) यांनी आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला होता व त्याला शरण येण्याचे आवाहन केले होते. या दरम्यान तांत्रिक विश्लेषणावरून तो अ.नगर जिल्ह्यातील सुपे गावातील हद्दीत असल्याचे निदर्शनास आले. पुणे ग्रामीण पोलीस व अ. नगर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत त्याला सुपे गावाच्या हद्दीत जेरबंद करण्यात यश आले होते. पोलीस पथकाने त्याच्याकडून रिव्हॉल्वर व राऊंड जप्त करण्यात आले होते.