SPORT – कटारिया करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स संघाने मारली बाजी, अंतिम सामन्यातील शेवटच्या चेंडूवर गुलबर्गा संघावर केली मात



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

भीमथडी शिक्षण संस्था व सेंट्रल रेल्वे ज्युनियर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कटारिया करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये नेरूळच्या प्रदीप स्पोर्ट्स संघाने अंतिम सामन्यात के. बी. एन( गुलबर्गा) संघाचा पराभव करीत कटारिया ट्रॉफी व विजेत्या संघासाठी चे दिड लाख रुपये चे बक्षीस पटकाविले. 

मर्यादित 20 षटकांचा अंतिम सामना अपेक्षे प्रमाणे अतिशय चुरशीचा ठरला, सामन्याच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर प्रदीप स्पोर्टच्या सागर मुळे या फलंदाजाने विजयी धाव घेत सामना जिंकून उपस्थित क्रिकेट प्रेमींची मनेही जिंकली आणि त्यामुळेच जिगरबाज खेळी करणारा सागरच अंतिम सामन्याचा सामनावीर सुद्धा ठरला. अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकून गुलबर्गा संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मर्यादित 20 षटकांमध्ये तब्बल 170 धावा केल्या. 

सुरुवातीला अशक्यप्राय वाटणाऱ्या या 170 धावा नेरूळ संघाने डॅशिंग फलंदाजीचा नमुना दाखवीत 20 व्या म्हणजेच सामन्याच्या शेवटच्या षटकात पार करीत कटारिया ट्रॉफी वर आपले नाव कोरले. कटारिया ट्रॉफी चे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते, यावर्षी पुणे, सोलापूर, नगर, मुंबई,गुलबर्गा शहरातील आठ दिग्गज संघांना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. स्पर्धा लीग -कम नॉक आउट पद्धतीने खेळविली गेली. स्पर्धेतील दोन उपांत्य सामने अतिशय अटीतटीचे झाल्याने अंतिम सामनाही चूरशीचा ठरणार याचा अंदाज दौंडकर क्रिकेट प्रेमींना आल्याने अंतिम सामना पाहण्यासाठी दौंड करांनी मोठी गर्दी केली आणि अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना त्यांनी दिलखुलास पणे चेअरअप करीत क्रिकेटचा थरार अनुभवला.

अंतिम सामना होताच मैदानावरच मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा शितल कटारिया, प्रेमसुख कटारिया, वासुदेव नाना काळे ,अनिल सोनवणे, रा रा पो दल गट क्रमांक 5 चे समादेशक तानाजी चिखले, डॉ.एल. एस. बिडवे, ॲड. सुधीर पाटसकर, गोविंद अग्रवाल, रमेश कटारिया, तसेच रेल्वे ज्युनियर इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी संजय गवळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते— विजेता संघ- प्रदीप स्पोर्ट्स (नेरूळ), उपविजेता संघ- के बी एन संघ (गुलबर्गा) ट्रॉफी व 90 हजार रू रोख. सर्वोत्तम फलंदाज- श्रीपाद निंबाळकर (नगर), सर्वोत्तम गोलंदाज- सागर मुळे (नेरूळ). सर्वोत्तम यष्टीरक्षक- वैष्णव जावळे (गुलबर्गा). सर्वोत्तम उदयोन्मुख- रोहित हाडके (पुणे). मालिकावीर- अविनाश देवरुखकर (गुलबर्गा).

रिजवान पटेल व इस्माईल पठाण यांनी पंच म्हणून तर अनिल नेवासकर यांनी समालोचक म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. 

गुणलेखक म्हणून भरत हिरणावळे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन शिवाजी रसाळ आणि एन. बी. नाडगौडा यांनी केले. सलग 25 वर्ष भीमथडी शिक्षण संस्थेचे क्रीडाशिक्षक माधव बागल यांच्या अथक परिश्रमाने स्पर्धा यशस्वी पार पडत आहे.