‘वंचित’ च्या दौंड बंदला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ‘दहन’

अख्तर काझी

दौंड : राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणाऱ्या भीमसैनिकावर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करीत त्याला अटक केली या घटनेचा निषेध म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत दौंड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना वंचित चे कार्यकर्ते

वंचित ने दौंड बंदची हाक दिलेली होती, त्याला येथील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध रॅली काढली. दौंड पोलीस स्टेशन समोर रॅलीची सांगता करण्यात आली. या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे,नागसेन धेंडे, पांडुरंग गडेकर यांनी आपल्या भाषणातून भाजपा सरकार व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. ज्या भीमसैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो मागे घ्यावा तसेच चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारच्या दबावाखाली काम करीत दलित कार्यकर्त्यावर गंभीर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाचाही निषेध यावेळी करण्यात आला. भाजपातील नेत्यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचे सत्रच सुरू केले आहे, निवडणुकीदरम्यान हेच मंत्री रस्त्यावर उतरून आमच्याकडे मतांची भीक मागतात त्यांनी महान राष्ट्रपुरुषांविषयी बोलू नये. आज तुमचे सरकार आहे म्हणून तुम्ही बेताल वक्तव्य करत आहात परंतु अशाच घटना पुन्हा झाल्या तर समस्त बहुजन समाज, दलित समाज तुमचे सरकार घरी घालवल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.
दौंड पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करून तमाम भारतीयांची मने दुखावली आहेत.

तसेच चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाही फेकून निषेध करणाऱ्या मनोज गरबडे व इतरांवर सूड भावनेने खोटा व गंभीर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ दौंड बंद आंदोलन करीत आहोत. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.