दौंड : बोगस मतदारांवरून वाखारी च्या ग्रामसभेत मोठा गोंधळ!

दौंड : वाखारी (ता.दौंड) या गावच्या विशेष ग्रामसभेत मतदारांच्या बोगस नावावरून मोठा गोंधळ झाला असून याबाबत हरकती घेण्यात आल्या असल्याची माहिती वाखारी येथील शिवसेना शाखा प्रमुख संदीप मोरे यांनी दिली. आजची विशेष ग्रामसभा ही मतदार नोंदणी, नावे कमी करणे इत्यादींबाबत दौंड तहसीलदार यांच्या कार्यालयाकडील आदेशावरून घेण्यात आली होती.

ग्रामसभेच्या सरपंच सौ.शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. या वेळी ग्रामविकास अधिकारी आणि तलाठी वाखारी यांनी मतदार यादी वाचून दाखवली असता सुमारे तीनशे ते साडेतीनशे बोगस मतदार या यादीत समोर आले. त्यामुळे या सभेत गोंधळाचे वातावरण तयार होऊन नागरीकांनी यावर आक्षेप घेतल्याने एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर येथील वातावरण काहीसे निवळले.

या सर्व प्रकारानंतर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भापकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन शेळके, औदुंबर शेळके, राहुल शेळके, हनुमंत जगताप, शिवसेना शाखा प्रमुख संदीप मोरे, अमर शेळके, सागर मसूडगे व ग्रामस्थांनी यातील बोगस, दुबार नावे कमी करण्यासाठी लेखी अर्ज दिले.

विशेष ग्रामसभा खेळीमेळीत, गोंधळ नाहीच.. हा बदनाम करण्याचा डाव : सरपंच सौ.शोभा शेळके

वाखारी येथील विशेष ग्रामसभा ही खेळीमेळीत पार पडली असून या ग्रामसभेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचे सरपंच सौ.शोभा धनाजी शेळके यांनी सांगितले. तसेच काहींनी फक्त बदनाम करण्यासाठी या ग्रामसभेत गोंधळ झाला असे सांगत असून ते साफ चुकीचे आहे. येथे उपस्थित शासकीय अधिकारीही याबाबत माहिती देऊ शकतात. या ग्रामसभेत नागरिकांच्या ज्या ज्या हरकती आल्या आहेत त्या सर्व हरकती उपस्थित अधिकारी हे वरिष्ठांना पाठवून तेथून त्याबाबत योग्य निर्णय होणार आहे अशी माहिती सरपंच सौ शेळके यांनी दिली.