अख्तर काझी
दौंड : अतिशय किरकोळ कारणावरून मोठ्या मुलाने आपल्या पत्नी सोबत मिळून स्वतःच्या आईला व लहान भावाला चाकूने मारहाण करण्याची घटना दौंड तालुक्यातील सोनवडी गावात घडली आहे. याप्रकरणी संगीता सुरेश पवार (वय 50,रा. घोलपघर, सोनवडी दौंड) यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी मुलगा सागर सुरेश पवार व त्याची पत्नी अर्चना सागर पवार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1),115(2),351(2),352,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान सोनवडी गावातील घोलपघर येथे घडली. फिर्यादी यांना आपल्या घराशेजारी असलेली नारळाची झाडे तोडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी आपल्या सुनेला ही झाडे कोणी तोडली याबाबत विचारणा केली. आपल्या पत्नीला का विचारले याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या मोठ्या मुलाने व सुनेने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.
भांडणे सोडविण्यासाठी लहान भाऊ मध्यस्थी करण्यासाठी आला असता आरोपी सागर याने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आपल्या खिशातील चाकू काढून त्याने फिर्यादी यांच्या हातावर व लहान भावाच्या पाठीत वार करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.