दौंड मधील कचरा संकलन/व्यवस्थापनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा

दौंड (अख्तर काझी) : दौंड शहरात सध्या सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. नगरपालिकेने शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनाबाबत त्वरित कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रवादी पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील कचरा समस्या, वाहतूक व पार्किंग समस्या तसेच येथील नेहरू चौक ते मारुती मंदिर रस्त्याच्या कामाबाबत दौंड शुगरचे संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी आज दि. 25 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय कावळे यांची भेट घेतली व सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक वसीम शेख, राजेश गायकवाड, जीवराज पवार, अनिल साळवे, सुहास वाघमारे तसेच प्रशांत धनवे आनंद बगाडे उपस्थित होते.

पक्षाच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरात मागील एक महिन्यापासून घनकचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. दौंड नगरपालिकेच्या वतीने कचरा संकलन व व्यवस्थापनाचे काम सुरू होते परंतु या कामाच्या निविदेची मुदत संपल्यामुळे सध्या ते बंद झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. वास्तविक कचऱ्याची पुढील काळात येणारी समस्या लक्षात घेता या कामाचे टेंडर संपण्याआधीच पुढील टेंडर बाबत प्रशासकीय तयारी करणे गरजेचे होते.

या संदर्भात पुढील टेंडर देण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी. शहरातील कचरा संकलन व त्याचे व्यवस्थापनाचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

वीरधवल जगदाळे यांनी मुख्याधिकारी यांच्याशी, शहरातील वाहतूक व पार्किंगच्या समस्यांबाबतही चर्चा केली. सध्या शहरात वाहतूक व पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पार्किंगची सुविधा नसल्याने येथील बाजारपेठेवर परिणाम होत असून व्यापारी वर्गाचे ही आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील नागरिकांसह बाजारपेठेत ग्रामीण भागातूनही ग्राहक येतात, यामुळे बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण वाढत आहे. या ग्राहकांना त्यांची वाहने कोठे लावावीत असा प्रश्न पडतो. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शहरातील पार्किंगचा विषय मार्गी लावावा अशी मागणी जगदाळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.