दौंडमध्ये युवकाने घडवले माणुसकीचे दर्शन, हरवलेली महत्वाची कागदपत्रे फोनकरून केली सुपूर्द

दौंड : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःकडेही लक्ष देण्याइतपतही वेळ मिळत नाही इतका माणूस आपल्या कामांमध्ये व्यस्त बनला आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या एखाद्या वस्तूकडे लक्ष देणे तर दुरापस्तच आहे. परंतु अशीही काही उदाहरणे पाहायला मिळतात की त्यामुळे माणुसकी अजून जिवंत असल्याचा साक्षात्कार होतो.
काल अशीच घटना घडली, आपल्या मुलीच्या ऍडमिशनसाठी केडगाव येथील रहिवासी जहांगीर शेख हे दौंड तहसीलमध्ये महत्वाची ओरिजनल कागदपत्रे घेऊन गेले होते. तेथील कामे उरकल्यानंतर ते घरी निघाले आणि दौंड शहर सोडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली सर्व ओरिजनल कागदपत्रे असणारी फाईल ही आपण बोलण्याच्या नादात गाडीच्या टपावर तशीच ठेवली आहेत. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला घेऊन टपवर पाहिले तर ती फाईल कुठेतरी पडली असल्याचे त्यांच्या ध्यानात आले.
मुलीचे सर्व शालेय ओरिजनल दाखले, व अनेक वर्षांपासून जमवत आलेली इतर सर्व ओरिजनल कागदपत्रे त्या फाईलमध्ये असल्याने त्यांची चिंता आणखीनच वाढली. ते ज्या रस्त्याने आले होते त्या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली मात्र फाईल कुठेच आढळली नाही. हताश होऊन आता पुढे काय? असा विचार करत ते बसले होते तेवढ्यात त्यांचा मोबाईल खणखणला आणि पुढील व्यक्तीचे संभाषण ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता मिटून एकदम प्रसन्नतेचे भाव दिसू लागले.
समोरील बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव सोहेल उस्मान शेख असल्याचे सांगत तुमची कागदपत्रे आम्हाला रस्त्यामध्ये सापडली असून त्यावर तुमचा नंबर शोधून आम्ही फोन केला असल्याचे व ते सध्या त्यांच्या दौंड शहरातील पुना ऑटोमोबाईल येथे असल्याचे सांगितले. हा फोन ऐकताच जहांगीर शेख यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी सोहेल शेख यांच्या पुना ऑटोमोबाईल्स येथे जाऊन आपली हरवलेली कागदपत्रे ताब्यात घेतली.
सोहेल उस्मान शेख (रा.बंगला साईड, दौंड) या तरुणाने या बदल्यात साधा चहा सुद्धा घेतला नाही उलट जहांगीर शेख व त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांची पाहुणचाराप्रमाणे विचारपूस करून इतके कधी काही अडचण आल्यास अथवा काहीही काम असल्यास आवर्जून सांगा असे म्हणत स्वतःचा चांगुलपणाही सिद्ध केला.
आज समाजात अश्याच स्वयंसेवकांची निश्चित गरज आहे जे इतरांचे दुःख हे स्वतःचे दुःख समजून समाजाची सेवा करतात.