दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे बाहेरच्या जिल्ह्यातून रोजगारासाठी आलेले मोहम्मद अन्सारी (मिस्त्री) हे पत्नीसह म्हसोबा माळ येथे राहत होते. त्यांचा गुरुवारी अचानक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळला. अन्सारी यांचे जवळील असे कोणीच नातेवाईक केडगावमध्ये नसल्याने त्यांचे शवविच्छेदन करून नंतर दफनविधी करण्याची प्रक्रिया पार पडणार होती. महम्मद मिस्त्री हे आपले शेजारी होते या भावनेतून त्यांच्या शेजारी असणाऱ्या हिंदू बांधवांनी यावेळी मोठी साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
सोशल मीडियावरून पसरविल्या जाणाऱ्या जातीवादी लिखानाच्या काळात हे सर्व घडत असल्याने जातीवादी लोकांची तोंडे मात्र पाहण्याजोगी झाली होती. महम्मद मिस्त्री यांच्या मृत्युची खबर मिळाल्यानंतर केडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य नितीन जगताप यांसह त्यांचे सहकारी मित्र सागर वसेकर, उत्तम घुगे, तुषार शेलार, गणेश घुगे, समाधान दाणे, धनंजय राऊत, शिवा पिसे, हरी सूर्यवंशी, राजू देवकर या हिंदू बांधवांनी एकत्र येत अगोदर महम्मद मिस्त्री यांच्या परिवाराला आधार दिला. त्यानंतर केडगाव स्टेशन मुस्लिम जमातीच्या प्रमुखांशी संपर्क साधून दफनविधी साठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी दर्शवली आणि त्यानंतर ज्यावेळी महम्मद मिस्त्री यांचा मृतदेह शवविच्छेदन करून आला त्यावेळी या सर्वांनी मिळून महम्मद मिस्त्री यांच्या मृतदेहासाठी कफन फाडण्यापासून ते त्यांची अंघोळ घालणे, त्यांचा जनाजा सजवणे, कब्रस्थान पर्यंत जनाजा घेऊन जाताना त्यास खांदा देणे आणि मुस्लिम रितिरीवाजप्रमाणे दफनविधी करेपर्यंत या सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांच्या खांद्याला खांदा देऊन तेथे काम करत मोठे सहकार्य केले.
हे सर्व अंतिम सोपस्कार होत असताना तेथे मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आणि हे सर्वजण मिळून दफनविधी पार पाडत असल्याचे सर्वजण पाहत होते.
दररोज झोपेतून उठले की सोशल मीडियावर हिंदू -मुस्लिम करणाऱ्या जातीवादी मंडळींना मात्र या हिंदू मुस्लिम एकीने आपला डाव फसतो की याची भावना निर्माण होऊन रात्रीची झोप दुर्धर झाली असणार यात शंका नाही.