दौंड : जिल्हा परिषदेच्या 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत मौजे देऊळगावराजे (ता.दौंड)येथे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या शिलाई व शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
ग्रामीण भागातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने तसेच समाज कल्याण विभागाच्या वतीने देखील शिलाई मशीन वितरित होत असतात. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षण शिबिरातील सहभागी महिलांना दौंडच्या काझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत प्रशिक्षण दिले गेले.
महिलांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी यावेळी केले. तसेच शिबिरास सहकार्य करणाऱ्या काझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे आभार मानले.
या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सदस्या ताराबाई देवकाते, दौंड नगरीचे मा.नगराध्यक्ष बादशाह शेख, देऊळगाव राजे च्या सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच बाबू पासलकर, काझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्रमुख अंजुम काझी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला भगिनी उपस्थित होत्या.