|सहकारनामा|
पुणे : सोशल मीडियावर पिस्तुल दाखवून त्याचे व्हिडीओ तयार करून स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी चांगलाच पोलीसी खाक्या दाखवला आहे. पिस्तुल चे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या दोन तरुणांना शहरातील गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.
आकुर्डी परिसरातील आरशान शकिर शेख आणि उमेर जाकीर शेख अशी अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एक स्वदेशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलीस कर्मचारी रामदास कुंडलिक मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर पिस्तूलासोबत स्वतःचे फोटो, व्हिडीओ बनवून ते प्रसिद्ध केले होते. याची खबर गुंडा विरोधी पोलीस पथकाला लागली आणि या पथकाने दोन्ही आरोपींना ते राहत असलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांची झडती असता त्यांच्याकडे त्या व्हिडीओ मधील पिस्तुल आणि त्यांच्या मोबाईलमध्ये पिस्तूलासोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. यानंतर पोलिसांनी या दोघांना जेरबंद केले.
याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी असे प्रकार सोशल मीडियावर करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना द्यावी असे आवाहन केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.