राहुल अवचर
देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण गावचे युवा नेते शरदचंद्र सूर्यवंशी यांची शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांनी मागील अठ्ठावीस वर्षांपासून शिवसेनेत एकनिष्ठपणे शिवसैनिक म्हणून काम केले आहे.
शरदचंद्र सूर्यवंशी यांनी १९९५ साली शिवसेना दौंड तालुका प्रमुख, १९९८ साली दौंड तालुका उपप्रमुख, २००६ साली दौंड तालुका प्रमुख तर २०१७ साली पुणे जिल्हा समन्वयक बारामती लोकसभा म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. शिवसेनेचा दौंड तालुक्यात एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
यापूर्वी त्यांनी मलठण देऊळगावराजे गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवली आहे. सूर्यवंशी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी, मिळालेल्या संधीचे सोने करुन शिवसेनेचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न येथून पुढील काळात केले जातील तसेच पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांचे विचार आणि पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असे आवर्जून सांगितले.