दौंडच्या श्रीराम फायनान्स ऑफिसमध्ये कोयता घेऊन राडा, शहरात मात्र वेगळीच चर्चा

पुणे (अब्बास शेख) : दौंड शहर येथे असणाऱ्या श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये सात जणांनी घुसून धुमाकूळ घातल्याने त्यांच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भूषण देवकाते यांनी फिर्याद दिली असून आरोपी संजय बारवकर, राजेंद्र बारवकर, अमित बारवकर, नागनाथ भगत आणि इतर तीन असे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरातील श्रीराम फायनान्स च्या कार्यालयात वरील आरोपिंनी जाऊन तेथील शाखा धिकाऱ्याला कोयता दाखवून शिवीगाळ केली. या सर्वांनी अगोदर श्रीराम फायनांन्सच्या कार्यालयात प्रवेश करत येथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोनवर करण्यात आलेल्या शिवीगाळ, धमकी प्रकरणी जाब विचारला. मात्र फोनवरील संभाषण हे आमच्या कार्यालयातील कुणाचेही नाही असे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले.

https://youtu.be/0pJEdZVXR2g?si=wnb4ytcKYutF9w6Z

मात्र त्यांचे यावर समाधान झाले नाही. यावेळी सर्व आरोपिंनी या कार्यालयात दहशत माजविण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार cctv मध्ये कैद झाला आहे. या आरोपींमध्ये दौंड शहरातील एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. ही घटना श्रीराम फायनान्स कार्यालयात २६ जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या आसपास घडली आहे. काल घडलेल्या या घटनेनंतर फिर्यादीकडून रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाला दुसरी किनार – मिळत असलेल्या माहितीनुसार यातील मुख्य आरोपीने या फायनान्स कंपनीकडून गाडीवर लोन घेतले होते मात्र हे थकत गेले आणि त्यांना फोन येऊ लागले. यानंतर काही फोन हे अश्लील शिवीगाळ करणारे आणि धमकीचे होते या सर्व प्रकरणाचा जाब विचारायला आरोपी थेट श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये गेले मात्र तेथे हत्यार घेऊन गेल्याने आणि बाचाबाची, शिवीगाळ करण्यात आल्याने हे प्रकरण चिघळले अशी माहिती मिळत आहे.