Shop Seal in Daund : कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करणारी दौंड मधील चार दुकाने पोलिसांनी केली सील



|सहकारनामा|

दौंड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वत्र लॉक डाऊन लागू केला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास बंदी आहे असे असतानाही काही व्यापारी प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून दुकाने चालू ठेवीत आहेत. 

अशा दुकानांवर दौंड पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केले आहे.आज दि.23 मे रोजी शहरातील चार दुकानांना दौंड पोलिसांनी सील ठोकले आहे. दौंड- गोपाळवाडी रोड परिसरातील सरपंच वस्ती येथील  मकसाने सुपर मार्केट, आंबेडकर चौक येथील सपना ड्रेसेस व ओम बँगल्स अँड गिफ्ट हाऊस तसेच गांधी चौकातील अहुजा मोबाईल शॉप या दुकानांवर कारवाई करण्यात आली. 

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना वारंवार सूचना देऊनही काही दुकानदार सूचनांचे पालन करीत नाहीत असे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी अशी दुकाने सील करण्याचे प्रस्ताव तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे पाठविले होते, सदरचे प्रस्ताव तहसीलदारांनी मंजूर केल्याने दुकाने पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आली आहेत. 

सदरची कारवाई दौंड नगर पालिकेच्या सहकार्याने चालू असून अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर यापुढेही अशीच कारवाई करणार असल्याचा इशारा नारायण पवार यांनी दिला आहे.