शिरूरमध्ये भाजपसह अशोक पवारांना झटका.. दादा पाटील फराटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

शिरूर : शिरूर तालुका भाजप चे माजी अध्यक्ष आणि घोडगंगा कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व घडामोडीमुळे शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शह देण्यासाठी ही रणनीती वापरल्याचे बोलले जात आहे. या सर्व नेतेमंडळींचा पक्ष प्रवेश इंदापूर येथील मेळाव्यात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये झाला. फराटे हे आमदार अशोक पवार यांचे कट्टर विरोधक समजले जातात. तसेच ते घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक असून अजित पवारांनी त्यांना पक्षात घेऊन बळ देण्याचे काम केले आहे.

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई आणि मांडवगण फराटा हा भाग आमदार अशोक पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्या बालेकिल्ल्याला उध्वस्त करण्यासाठी अजित पवार यांनी ही रणनीती आखल्याचे बोलले  जात आहे. दादा पाटील फराटे यांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाचे कामकाज पाहिले होते. तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून ही कामकाज पाहिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, भाजप नेते राजेंद्र कोरेकर, वडगाव रासाई-मांडवगण फराटा गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी फराटे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक आत्माराम फराटे, पंचायत समिती सदस्य (मांडवगण फराटा गण) राजेंद्र गदादे, लक्ष्मण बापू फराटे आदींनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.