अख्तर काझी
दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विशेष प्रयत्न करून शहरातील शिवस्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 15 लाख रुपयांचा चा निधी दिला आहे. मात्र दौंड नगरपालिका तसेच येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे सुशोभीकरणाचे काम रखडले आहे असा आरोप करीत शिवस्मारक समितीच्यावतीने येथील शिवाजी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये शिवस्मारक समितीचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होते.
शिवस्मारक सुशोभीकरणाचे काम रखडविण्यास कारणीभूत असलेले दौंड नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खाते तसेच अष्टविनायक मार्ग रस्ता कामाच्या ठेकेदाराविरोधात निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शिवस्मारक समितीने, नगरपालिका मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे शिवस्मारक परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थे बाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे, परंतु दोन्ही खात्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.दि.2 मे रोजी शहरातील शिवजयंती येथील सर्वधर्मीय व पक्षीय पारंपारिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. जयंती आधी शिव स्मारकासमोरील सर्व अर्धवट कामे पूर्ण करण्यात यावीत अशा मागणीचे पत्र शिवस्मारक समितीच्यावतीने देण्यात आले होते. तसेच सदरचे काम सुरू झाले नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता मात्र तरीसुद्धा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवस्मारक समितीच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शिवस्मारक समितीचे पदाधिकारी सचिन कुलथे, अनिल सोनवणे,राजन खटी, संतोष जगताप, अशोक जगदाळे, विनय लोटके,निखिल स्वामी, अजय कटारे यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला.