दौंड : भारताची शान आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देशातील जनतेकडून प्रचंड पैसा निधी स्वरूपात गोळा केला व तो पैसा स्वतःच्या फायदा करिता वापरला त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करून दौंड शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने येथील शिवाजी चौकामध्ये करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान करण्यात आली.
यावेळी पक्षाच्यावतीने दौंड पोलिसांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, अनिल सोनवणे,आनंद पळसे, देविदास दिवेकर, स्वाती ढमाले,रामदास काळभोर, अजय कटारे ,प्रसाद कदम, चेतन लवांडे आदी उपस्थित होते.
किरीट सोमय्या यांनी 2013 सालामध्ये आय एन एस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्या नावावर जनतेकडून प्रचंड निधी गोळा केला. नेव्ही नगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी हजारो रुपये यावेळी दिले. सदरची रक्कम सोमय्या हे भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होते. मात्र सोमय्या यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनला मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
सोमय्या यांनी लोकांच्या देश प्रेमाशी खेळून देशाशी गद्दारी केली आहे त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
काल दि.7 एप्रिल रोजी शिवसेनेचे बारामती मतदार संघ समन्वयक शरदचंद्र सूर्यवंशी गटाने सोमय्या यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने शहरात आलेले पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्याशी याविषयी बातचीत केली असता ते म्हणाले की, संपूर्ण पुणे जिल्ह्याचा एकच संपर्कप्रमुख आहे ते म्हणजे सचिन आहेर. सध्या पक्षात अनेक स्वयंघोषित आहेत. परंतु शिवसेनेमध्ये प्रोटोकॉल पाळला जातो त्यामुळे अशांवर नक्कीच कारवाई होणार आहे आणि त्यांची आहे ती पदेही जाणार आहेत हे निश्चित.
पासलकर यांना आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीविषयी विचारले असता ते म्हणाले की,नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शहरामध्ये आढावा घेतलेला आहे. आज तरी सदरची निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी ठेवलेली आहे फक्त वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे पासलकर म्हणाले.