दौंड : दौंड शहरात शिवजयंती निमित्त पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात अवनीश गर्जे याने तर खुल्या गटात प्रसाद जगताप यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे यंदा दहावे वर्ष होते.
दौंड शहरातील स्वर्गीय लाजवंती गॅरेला हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे संयोजन दौंड शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या विद्यमाने करण्यात आले होते. नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरूमुख नारंग यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. शिवजयंती समितीचे अध्यक्ष नितीन वाघ, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र खटी, उद्योजक स्वप्नील शहा, डॅा. प्रा. अरूणा मोरे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड, आदिनाथ थोरात, विनायक सुंभे, शामराव वाघमारे, विनय लोटके, सोमनाथ लवंगे यांच्यासह जावेद सय्यद व समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी व नागरिकांनी आत्मविकास साधत राष्ट्रविकासात योगदान देण्याचे आवाहन दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी या वेळी केले. स्पर्धेत पुणे जिल्ह्यासह नगर, रायगड, उस्मानाबाद, धुळे, कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ( गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक) :-
- इयत्ता १ ली ते ४ थी गट : अवनीश संदीप गर्जे, सर्वेश किरण शेळके, आर्या गोविंद वर्पे.
- इयत्ता ५ वी ते ८ वी गट : वैभव संतोष जांभळे, सृष्टी अशोक काळे, समृध्दी संदिप कोथंबिरे.
- इयत्ता ९ वी ते १२ वी गट : अंकिता अंकुश मोरे, शिवानी विठ्ठल शेलार, अंकिता अनिल जाधव.
- खुला गट : प्रसाद जगताप, प्रतिक्षा पायगुडे, गौरी वाळूंजकर.
दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे व दौंड मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. बाळासाहेब बारंगळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॅा. प्रा. मधुकर मोकाशी, डॅा. प्रा. शोभा वाईकर, प्रा. दिनेश पवार, प्रा. महेश माने, प्रा. वैशाली काकडे, लालासाहेब साळवे, संपदा दुधाट, अर्चना साने व आरती लेले यांनी परीक्षण केले. मुख्याध्यापक भाऊसाहेब शिर्के, अशोक भूजबळ, आदींनी संयोजनासाठी सहकार्य केले.