मासे व्यवसायिकाला खंडणीसाठी धमकावले, ‘शिवम आंदेकर’ याला अटक

पुणे : पुणे शहरात भाईगिरी करणाऱ्या टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. कधी खंडणीसाठी धमकी तर कधी जबर मारहाण, खून असे प्रकार पुणे शहरात राजरोसपणे घडत असताना दिसत आहेत. आता पुन्हा एक खंडणीचे मोठे प्रकरण पुढे आले असून पुण्यातील नाना पेठेत मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका मासे विक्रेत्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीतील म्होरक्या शिवम आंदेकरला पोलिसांनी अटक केली आहे. शिवम आंदेकरसह पाच ते सहा साथीदारांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मासे व्यवसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा नानापेठेत मच्छी मार्केट परिसरात मासे विक्रीचा स्टॉल आहे. कुख्यात गुंड शिवम आंदेकर हा त्याच्या साथीदारांसह मागील तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दर महिना ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करत होता तसेच खंडणीचे पैसे दिले नाही तर स्टॉल बंद पाडून जीवे मारण्याची धमकी देत होता असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

या सर्व प्रकाराला तक्रारदाराने कंटाळून अखेर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे फरासखाना पोलिसांनी शिवम आंदेकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलिसांनी त्वरित फिर्यादीची दखल घेत शिवम आंदेकरला अटक करत त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांना शोधण्यासाठी विविध पथके तयार केली आहेत.

पुणे शहरातील व्यवसायिक आणि मासे विक्रेत्यांकडून खंडणी मागण्याचा हा प्रकार गंभीर आहे त्यामुळे अश्या प्रकारे जर कोणी धमकावत असेल तर त्यांनी त्वरित स्थानिक पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.