भाजप चे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचे निधन

अहिल्यानगर : भाजप चे ज्येष्ठ नेते आणि आमदार संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजीराव कर्डीले यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. शिवाजीराव कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल सहावेळा आमदार पद भूषवले होते.

शिवाजीराव कर्डीले हे नुकतेच दुर्धर आजारातून बरे झाले होते. कर्डीले यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नगरमधील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शिवाजीराव कर्डीले हे अगोदर दुग्ध व्यावसायिक होते नंतर ते गावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर ते अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरी येथे जाहीर सभा घेतली होती.