‘सर्वधर्म समभाव’ हा विचार शिवाजी महाराजांनी दिला, मात्र काहींनी ‘तो’ विचार तोडण्याचे काम केले आहे त्यामुळे… : उदयनराजे भोसले यांचा घनाघात

रायगड – शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव हा विचार दिला. मात्र काहीजण शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत येतात मात्र त्यांचे विचार हेतू पुरस्पर बाजूला ठेवतात हे देशाच्या एकतेसाठी घातक आहे असा घनघात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगड येथे केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी चुकीचे वक्तव्य केल्याने आज उदयनराजे भोसले यांचे रायगड येथे आक्रोश आंदोलन सुरु आहे त्यामध्ये ते बोलत आहेत. देशात अशीच वाईट परिस्थिती राहिली तर जसे देशाचे 3 तुकडे अगोदर झाले होते तसे यापुढे 30 तुकडे होण्यास वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त केली.

उदयनराजे भोसलेंचे पुढील आंदोलन आझाद मैदानावर..

उदयन राजे भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये विविध मुद्दे मांडताना यापुढील आंदोलन आझाद मैदानावर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच देशात जे काही वातावरण निर्माण करण्यात येत आहे ते खूपच चुकीचे असून, जे लोक जन्मापासून एकत्र लहानाचे मोठे झाले आज त्यांच्यामध्ये सुद्धा फूट पाडण्याचे त्यांचे ध्रुवीकरण करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराजांचा अपमान होताना तुम्ही गप्प का असा सवाल त्यांनी राज्यकर्त्यांना करून, सोईचे राजकारण फार काळ टिकत नाही. ज्या महाराजांनी सर्व जाती धर्माचे लोक जोडून हे राज्य उभे केले त्यास कुठेतरी तडा दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.