पुणे : शिवनेरी गडावरील शिवजयंती सोहळा उत्साहात आणि शासनाच्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे आणि सोहळा चांगल्यारितीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देखमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिवनेरी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याबाबत आयोजित आढावा बैठाकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अतुल बेनके, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अविनाश देशमुख, माजी आमदार शरद सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, नगराध्यक्ष शाम पांडे, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, गडाच्या पायथ्याशी वाहनतळाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. पंचायत समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची व्यवस्था करावी. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा. साखळदंड कड्याच्याबाजूने शिवप्रेमींना शिवजयंतीच्या दिवशी प्रवेश बंद ठेवावा. राज्य परिवहन महामंडळाने आवश्यकतेनुसार बसेसची व्यवस्था करावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी समन्वयाने वेळेत आवश्यक नियोजन पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.
आमदार बेनके म्हणाले, सोहळ्याशी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक परिसरात प्रदर्शित करण्यात यावे. येणाऱ्या शिवप्रेमींसाठी चौकशी कक्षाची व्यवस्था करण्यात यावी. वाहनतळांची संख्या वाढविण्यात यावी. पथदिव्यांची आवश्यक दुरूस्ती करण्यात यावी.
पोलीस अधीक्षक देशमुख यांनी वाहनतळाच्या ठिकाणांची निश्चिती आणि गर्दी नियंत्रणासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्याची सूचना केली. आपत्कालीन मदतीसाठी गिर्यारोहकांचे स्थानिक पथक तयार ठेवावेत असे त्यांनी सांगितले.
बैठकीत शिवप्रेमींनी सोहळ्याच्या नियोजनाच्यादृष्टीने उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीला सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.