दौंड : पुणे-सोलापूर हायवे आणि शिरूर-सातारा हायवेचा संगम होऊन वर्दळीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चौफुला चौकामध्ये सध्या बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांना ट्रॅफिक जामची समस्या भेडसावत आहे. हा ट्रॅफिक जाम प्रवासी वाहनांमुळे होत नसून चौफुला चौकामध्ये सुपे-मोरगाव रस्त्याला दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर उभ्या असलेल्या वाहनांमुळे होताना दिसत आहे.
अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या मोरगाव येथील गणपतीच्या दर्शनासाठी राज्यातून हजारो भाविक भक्त या रस्त्याने ये-जा करत असतात. मात्र चौफुला चौकामध्ये भाविकांच्या आणि प्रवाश्यांच्या वाहनांना मोरगावकडे जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे अनेक भाविक भक्त सांगत आहेत. कारण चौफुला चौकातून मोरगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक चहाची दुकाने, हॉटेल्स आणि इतर दुकाने सुरु असतात. या दुकानांपुढे मोठ्या प्रमाणावर चारचाकी आणि दुचाकी वाहने तासंतास उभी ठेवली जातात आणि या वाहनांच्या रांगा रस्त्याच्या मध्यापर्यंत येत असल्याचे चित्र येथे रोजच पाहायला मिळते. या वाहनांमुळे बाहेरून प्रवास करणारे प्रवासी, भाविक भक्त आणि इतर लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे स्थानिक पोलीस आणि ट्रॅफिक पोलीसांनी या चौकातील अनधिकृतपणे उभी करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करून हा रस्ता मोकळा करावा आणि संबंधित दुकानदारांना याबाबत तंबी द्यावी अशी मागणी होत आहे. या रस्त्यावरील ट्रॅफिक जामचा फटका या अगोदरही अनेकांना बसलेला आहे त्यामुळे येथे एखादी मोठी दुर्घटना होण्या अगोदर पोलीसांनी त्वरित येथे कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.