मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि संपूर्ण राज्याला एक मोठा धक्का देत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आणि एकच खळबळ माजली. शरद पवारांनी अचानक आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी ढसा ढसा रडू लागली, तर कार्यकर्त्यांचे अश्रू पाहून शरद पवारांनाही अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले.
शरद पवारांनी बोलताना, आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले तसेच आपण मला बोलवाल तेव्हा तेव्हा मी आपणामध्ये येत राहील. मी आपल्यासोबत होतो, आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबतच राहील असे त्यांनी म्हणताच समोरील कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि संपूर्ण सभागृहात एकच खळबळ माजली. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. त्यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गदारोळ झाला.
यावेळी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मात्र शरद पवारांच्या घोषणेचे समर्थन करत साहेबांना सुद्धा आपले वय, प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी तसेच पक्षाच्या नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊन त्यांचा भार हलका करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर सुप्रिया सुळे ह्या आपली भावना मांडायला उभ्या राहताच सुप्रिया तू गप्प बस, तू बोलू नको असे अजित पवार यांनी बोलल्याने सर्वजण अवाक झाले. तर मी तिचा मोठा भाऊ या नात्याने तिला गप्प बस बोललो असल्याचे अजित पवारांनी सांगितले. असा यावेळी अजित पवार सोडले तर सर्वजण पवार साहेबांच्या निर्णयाचा विरोध करत असून पवारांनीच अध्यक्षपदी रहावे यावर सर्वजण ठाम आहेत.