बारामती : राज्यातील प्रमुख लढतींपैकी बारामती विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काकांनी पुतण्या अजित पवार यांना शह देण्यासाठी अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना आपल्या राष्ट्रवादी (श.प) कडून तिकीट देऊन निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
हे होत असताना आता शरद पवार यांनी स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरून आजपासून सभांचा धडाका सुरु केला आहे. शरद पवार यांच्या आज बारामतीत तब्बल ६ सभा आणि मेळावे होत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून ते बारामतीकरांशी संवाद साधून युगेंद्र पवार यांना निवडून आणण्यासाठी लोकांना आवाहन करत आहेत.
इकडे शरद पवार यांनी आपली ताकद लावली असताना दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा स्वतः मैदानात उतरून प्रत्येक गावाचा दौरा सुरु केला आहे. ते प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत. आपले म्हणणे पटवून देत आहेत. अशातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभेत कुणामुळे पराभव झाला हेही आता या विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे बारामती सोडून अन्य तालुक्यांमध्ये अजित पवार जाऊन सभा घेणार का आणि त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
बारामतीमध्ये अजित पवार हे दौऱ्यादरम्यान लोकांना लोकसभेची आठवण करून देत आहेत आणि लोकसभेला ताईला मतदान करून साहेबांना खुश केलं, आता विधानसभा निवडणुकीत मला खुश करा, असे आवाहन ते गावकऱ्यांना करत आहेत. पवार साहेब जरी तुम्हाला भेटायला आले तरी आपण त्यांना सांगा, की लोकसभेला तुमचं काम केलं. तुम्हाला खुश केलं. आता ‘ दादा’ कामं करतात आता त्यांनाही खुश करू आणि बारामती तालुक्याचा विकास आपापल्या परीने करू असे आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केले आहे.