‛स्वामी समर्थ’ आणि ‘अफझलखान’ची भूमिका गाजवलेले अभिनेते ‛शैलेश पितांबरे’ यांचे दौंड येथे ‛निधन’

दौंड : ‘राजा शिवछत्रपती’ टीव्ही मालिकेतून अफझलखानची भूमिका अफलातून साकार करणारे अभिनेते शैलेश पितांबरे (वय ५६) यांचे आज सांयकाळी दौंड येथे निधन झाले. उंच भारदस्त देहयष्ठीला बुलंद आवाजाची जोड हे अभिनेता म्हणून त्यांचे वैशिष्ट्य होते. गेली दोन वर्षे ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी आहेत.
शालेय शिक्षण पुण्यात झाल्याने जयंत तारेंच्या बालनाट्य संस्थेतून त्यांना नाट्यकलेचे धडे गिरवता आले पण नंतर रेल्वेच्या नोकरीमुळे दीर्घ काळ त्यांना कला क्षेत्रापासून दूर राहावे लागले. त्यातूनही रेल्वे कल्चरल ग्रुपमधून काम करत राहून पुढे मात्र दौंडच्या ‘रचना’ संस्थेच्या माध्यमातून त्यांची कला कारकीर्द खऱ्या अर्थाने पुन्हा बहरू लागली.
व्यावसायिक नाटकात पदार्पणानंतर त्यांच्या वाटचालीस महत्त्वाचे वळण देणारी संधी मिळाली ती ‘रणांगण’ या नाटकातून जिथे त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या दिग्दर्शन व मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा अभिनेता ही ओळख प्राप्त करत पुढे अनेक नाटकांसोबत त्यांना मराठी चित्रपटातूनही भूमिका मिळत गेल्या. ‘स्वामी समर्थ’ या टीव्ही मालिकेत त्यांना स्वामींची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले. ‘राजा शिवछत्रपती’ तील अफझलखान हा त्यांच्या कारकिर्दीतील मानबिंदू ठरला. ‘अपहरण’, ‘शिखर’ आदी हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी लहानमोठ्या भूमिका केल्या होत्या.
दौंड परिसरात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात ते सत्यत्याने कार्यरत होते.