सिने जगत
मुंबई : शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट होताना दिसत आहे. ‘जवान’ ने 3 दिवसांतच अनेक चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. जवानच्या माध्यमातून शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
जबरदस्त स्टोरी, मुद्देसूद मांडणी आणि कमालीचा ऍक्शन ड्रामा यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. या चित्रपटाने गुरुवारी पहिल्याच दिवशी जगभरात 129.6 कोटी रुपयांची कमाई करत कामाचा दिवस असूनही शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अर्धशतक ठोकले आहे. भारताशिवाय परदेशातही हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे.
ट्रेड अॅनालिस्ट सुमित कडेल यांच्या मते, जवान चित्रपटाने दुसऱ्या दिवशी इतर भाषांमध्ये 53.23 कोटी रुपयांचा गल्ला केला असून हिंदी आवृत्तीने 46.23 कोटी रुपये जमा केले आहेत. तामिळ आवृत्ती आणि तेलुगू आवृत्तीमध्ये त्याने 7 कोटी रुपये जमा केले आहेत. दोन दिवसांनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 128 कोटी रुपये झाले आहे.
आज शनिवारीही जवान बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय मल्टिप्लेक्समध्ये 22.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये 17.90 कोटी रुपये, सिनेपोलिसमध्ये 4.55 कोटी रुपये कमावले आहेत. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, जवान अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जबरदस्त कमाई करत आहेत.
दुसरा दिवसही जवानसाठी ऐतिहासिक ठरला असून ब्रिटनमध्ये 6.41 कोटी रुपये जमा झाले आहेत. ऑस्ट्रेलियात दोन दिवसांत 4.77 कोटी रुपये आणि न्यूझीलंडमध्ये 96.06 लाख रुपये कमावले आहेत. याशिवाय जर्मनीमध्ये 2.64 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय चित्रपटाने मुव्ही मॅक्समध्ये 70.50 लाख रुपये आणि मिराजमध्ये 1.67 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
जवान चित्रपटाची एकंदरीत कमाई पाहता तीन दिवसांत जवानने 200 कोटींच्यापुढे गल्ला जमवला आहे. शाहरुख खान याचा पठाण या अगोदर एक हजार कोटीच्या घरात गेला होता आता जवानही त्याच मार्गाने वाटचाल करत आहे. जवान चित्रपटात दाखविलेले ऍक्शन सिन आणि स्टोरी ही प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यशस्वी ठरली आहे.