अख्तर काझी
दौंड : रेल्वेमध्ये ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून सहाय्यक रेल्वे चालकाने वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून विकास कोमलप्रसाद पंथी (वय 38,रा. ओम शांती अपार्टमेंट, गजानन सोसायटी, दौंड) या सहाय्यक रेल्वे चालक (एस.ए.एल.एम) विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.16 फेब्रुवारी 2022 ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान वरील आरोपीने पीडित तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. पीडिता रेल्वेमध्ये ठेकेदारी पद्धतीने कामास होती. जानेवारी 2021 मध्ये पीडित तरुणी दौंड रेल्वे स्टेशन येथील लॉबीमध्ये काम करीत असताना तिची सहाय्यक रेल्वे चालक आरोपीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर गाठीभेटी प्रेमात होऊन सुरू झाल्या. दि.16 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपीने तरुणीला दौंड तालुक्यातील चौफुला येथील लॉजवर नेले व लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवीत आरोपी वारंवार शारीरिक संबंध ठेवत होता.
जुलै 2022 रोजी तरुणीला आरोपी सोबत काम करीत असलेल्या स्टाफकडून कळाले की, आरोपीचे लग्न झालेले आहे त्यामुळे तरुणीने याबाबत त्याला विचारले असता त्याने तरुणीचा फोन कट केला व तिचा फोन नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकून तो गावी निघून गेला. काही दिवसानंतर तो परत आला. तरुणीच्या वाढदिवशी (दि.28 डिसेंबर 22) त्याने तरुणीला फोन केला व म्हणाला की, मी माझ्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला आहे, प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे. परंतु आपले लग्न होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यामुळे दोघांचे सूत पुन्हा जुळले. दरम्यान चार महिने तो भुसावळ येथे ट्रेनिंगला गेला. ट्रेनिंग दरम्यान शनिवार -रविवार सुट्टी असल्याने तो दौंड येथील घरी येत होता व तरुणीला घरी बोलावून पुन्हा लग्नाचे अमिश दाखवून शारीरिक संबंध ठेवत होता.
नोव्हेंबर 2023 रोजी आरोपीने परत केडगाव येथील लॉजवर नेऊन तरुणीचे लैंगिक शोषण केले. यावेळेस त्याने पीडित तरुणीचे अश्लील फोटो सुद्धा काढले. 12 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या काळात तरुणीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी आपल्याशी लग्न करेल या आशेने तरुणी हा सर्व प्रकार सहन करत होती व तो घेऊन जाईल तेथे जात होती. दि.5 सप्टेंबर 2024 रोजी आरोपीने तरुणीला पुण्यातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये सोडले व सांगितले की माझी सोलापूर येथे बदली होईल त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेल तोपर्यंत तू येथेच रहा असे बोलून आरोपी तेथून निघून गेला.
त्या दिवसानंतर तरुणी त्याला वारंवार फोन करीत होती, परंतु तो तिच्याशी नीट बोलत नव्हता. दि.26 सप्टेंबर 2024 रोजी तरुणीने त्याला पुन्हा एकदा फोन केला असता तो म्हणाला की मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने दौंड पोलिसांकडे आरोपीची तक्रार करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.