अख्तर काझी
दौंड : आपल्या दुकानात कामावर असणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मालकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच दौंड शहरातील सदर घटनेमुळे व्यापारी वर्गासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी जय कमल मोटवाणी (वय 25,रा. जनता कॉलनी, बंगला साईड दौंड) याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 4,6 सह 64,64(2)(M),69,351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला बेडया ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना ऑगस्ट 2024 ते 2025 च्या पंधरा दिवसापूर्वीपर्यंत दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात घडली. आरोपी याने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता मात्र दौंड पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याला शिताफिने अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.