धक्कादायक | सातवीत शिकणाऱ्या पाच ते सहा अल्पवयीन विद्यार्थिनींवर शिक्षाकडून लैंगिक अत्याचार

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावात असणाऱ्या आश्रमशाळेत निवासी पाच ते सहा विद्यार्थिनींवर त्याच शाळेतील मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेने संपूर्ण सांगली हादरून गेली आहे.

या घटनेमुळे कुंपणच शेत खात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. घडलेल्या या घटनेचे जत तालुक्यासह सर्वत्र पडसाद उमटत आहेत. ही भयंकर घटना समजल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालिका धनश्री भांबुरे व पोलिस पथक दिवसभर शाळेत थांबून होते. यावेळी शाळेतील शिक्षकांचे जबाब घेण्यात आलेे.

या आश्रम शाळा संस्थेने त्या वादग्रस्त नराधम प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यावर फौजदारी कारवाई करण्यात येऊन त्यास कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिक आणि पालक वर्गातून करण्यात येत आहे.

ही धक्कादायक घटना समजताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी या शाळेला भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी पोलिस प्रशासन, बहुजन कल्याण विभाग अधिकारी, संस्था, पालक पदाधिकारी यांची पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत पोलिस व संबंधित विभागास पीडित मुलींची संख्या नेमकी किती आहे आणि या अगोदर या शिक्षकावर असे किती आरोप झाले आहेत याची सखोल चौकशी करण्याची सूचना त्यांनी दिली.

या गंभीर घटनेनंतर पीडित मुलींचे कुटुंबीय गायब झाले असल्याचे सांगितले जात असून याबाबत पडळकर यांनी सुमोटो गुन्हा दाखल करून चौकशी समिती नियुक्त करावी, समितीने तत्काळ अहवाल द्यावा, त्या नराधमाबाबत विद्यार्थिनी, पालक, सामाजिक कार्यकर्ते यांचे जबाब नोंदवून घ्यावेत, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींची गय करू नये असे आदेश दिले आहेत.

घटना गंभीर असल्याने याठिकाणी आमदार पडळकर यांसह पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, बहुजन कल्याण विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री फडणीस, तहसीलदार प्रवीण धानोरकर, पोलिस उपनिरीक्षक संजीव जाधव, निर्भया पथकाच्या मनीषा नारायणकर, सुनील व्हनखंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, सरपंच हिंदुराव शेंडगे, जालिंदर व्हनमाने, डॉ. वैशाली सनमडीकर, डॉ. कैलास सनमडीकर, रवी मानवर, संतोष मोटे, आण्णा भिसे असे विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.