भाजप चे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच मधुकर पिचड यांनी अनेक महत्वाची पदे भुषवली आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मधुकर पिचड यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मधुकर पिचड हे राज्याचे माजी मंत्री होते. अहिल्यानगर (अहमदनगर) अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून देखील कार्यभार पाहिला होता. अकोले तालुक्यामधील विकासात मधुकर पिचड यांचं महत्वाचं योगदान मानलं जातं. दरम्यान, २०१९ मध्ये मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.