राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी ‘विद्यामंदिर’ च्या ‘सफुरा सतारमेकर’ ची निवड

सुधीर गोखले

सांगली : सांगली जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रामध्ये विविध क्रीडा प्रकारांत आपल्या देशाला अनेक उत्तम खेळाडू दिले आहेत. मल्लविद्या, कबड्डी आणि क्रिकेट मध्ये अनेक नवोदित खेळाडूंनी चांगली कामगिरी करून जिल्ह्याचे नाव सर्वोच्च ठेवले आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून अनेक खेळाडू राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी अथक परिश्रम घेताना दिसून येतात. मिरजेतील सफुरा सतारमेकर हेहि एक नाव अशाच खेळाडूंमधून येत आहे.

सतारमेकर परिवाराचा सतार बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळत या कुटुंबाने मुलीला अत्यंत कष्टाने शिकून मोठे केले. लहानपणापासूनच सफुरा हिला कबड्डी खेळण्याची आवड पाहून तिच्या पालकांनीही तिला प्रोत्साहन देत तिच्यावर कोणती बंधने घातली नाहीत उलट तिला प्रशिक्षण देण्यासाठी ते उत्साही राहिले. सफुरा सध्या इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. ती आपला अभ्यास सांभाळून या खेळासाठी परिश्रम घेत असून तीचे आई, वडिल तिला चांगली साथ देत आहेत. सफूरा हीचीनिवड राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली असल्याने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

मिरज येथील विद्यामंदिर प्रशालेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सफुरा हिला संस्थेचे शैलेश देशपांडे आणि अनिल कुलकर्णी यांनी मोलाची मदत केली आहे. तिचे वर्गशिक्षक तसेच क्रीडा प्रशिक्षक यांनी तिला कबड्डी खेळाचे धडे चांगल्या प्रकारे दिले असून सफुरा हिच्याशी सहकारनामा ने संवाद साधला असता, या निवडीचे श्रेय माझ्या अब्बू आणि अम्मी चे असल्याचे तिने आवर्जून सांगितले.

शाळेचे अध्यक्ष शैलेश देशपांडे, क्रीडा शिक्षक पंडित कुलकर्णी, मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले असल्याचे सफूरा सांगते. तीच्या निवडीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांनी सफुरा हीचा सत्कार केला असून यावेळी मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अमृत कुमार शितोळे, पर्यवेक्षक श्री.मारुती नाळे, क्रीडा शिक्षक पंडित कुलकर्णी, दादासाहेब शिंदे हे उपस्थित होते.