दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड : दौंड तालुक्यात राहू आणि वरवंड या दोन गावात एकाच बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री दरम्यान घडला आहे. यातील एक एटीएम फोडताना सुरक्षा रक्षकाने हवेत गोळीबार केल्याने चोरटे तेथून पसार झाले.

या घटनेबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील राहू गावात इंडिया या खासगी बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम फोडण्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. चोरट्यांनी राहू गावात असलेले एटीएम मशिनच्या गाळ्याचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तेथे असणाऱ्या दादा मोरे या सुरक्षारक्षकाने  त्यांच्याकडील बंदुकी मधून हवेत गोळीबार केला.

सुरक्षारक्षक गोळीबार करत असल्याचे पाहून चोरटे पसार झाले. दुसरी घटना वरवंड या गावात घडली. पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या एका इमारतीच्या गाळ्यात इंडिया कंपनीचे एटीएम मशिन आहे. येथेही सोमवारी मध्यरात्री 2 वाजनाच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो प्रयत्नही अयशस्वी ठरला.

वरील दोन्हीही ठिकाणी कोणत्याही प्रकारची रक्कम चोरीला गेली नसून घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा असून तपास सुरू केला असता  तपासा दरम्यान पोलिसांना एक टेम्पो आढळून आला आहे. तो एटीएम घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येणार होता असा संशय पोलिसांना असून या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम यवत पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.