दौंड : आज खासदार संजय राऊत यांची वरवंड (ता.दौंड) येथे जाहीर सभा होणार असून त्या अगोदर ते भीमा पाटस कारखान्यावर जाणार आहेत. मात्र कारखान्यावर जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली असून भीमा पाटस कारखान्यावर प्रांतधिकाऱ्यांच्या आदेशाने आज 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सभे अगोदर खा.संजय राऊत भीमा पाटस कारखान्यावर जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज दि. 26 एप्रिल रोजी खासदार संजय राऊत यांची वरवंड (ता.दौंड) येथे जाहीर सभा होत आहे. खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस कारखान्याच्या संचालक मंडळावर 500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला असून त्या अनुषंगाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभे अगोदर खा.संजय राऊत हे भीमा पाटस कारखान्यावर जाऊन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै.मधूकाका शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. मात्र भीमा पाटस कारखान्यावर प्रांतधिकाऱ्यांच्या आदेशाने 144 कलम लागू करण्यात आले असल्याने येथील राजकीय वातावरण आत्तापासूनच तप्त होण्यास सुरुवात झाली आहे.
यवत पोलिसांकडून प्रांतधिकाऱ्यांचे हे पत्र प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आले असून ज्यामध्ये प्रांत कार्यालयाकडून 144 कलम आदेश का जारी करण्यात आले याचे कारण देण्यात आले आहे. या पत्रातील मजकूर पुढील प्रमाणे, यवत पोलिस स्टेशन हद्दीतील दौंड तालुका शेतकरी कृती समितीचे वतीने आयोजक श्री.राहुल रामदास दिवेकर (रा. वरवंड ता. दौंड) यांनी दिलेल्या पत्रान्वये दिनांक २६/०४/२०२३ रोजी मा. खासदार श्री.संजय राऊत (मा. खासदार शिवसेना उध्दव ठाकरे गट), मा. श्रीमती सुषमा अंधारे (उपनेते शिवसेना उध्दव ठाकरे गट) यांची मौजे वरवंड (ता.दौड) येथील श्री.नागनाथ विदयालय शाळेच्या मैदानावर सायंकाळी १७.०० वा सभा आयोजीत असून सदर सभेस जाणेपुर्वी मा. खासदार श्री संजय राऊत, मा. श्रीमती सुषमा अंधारे हे भिमा सहकारी कारखाना, पाटस येथे जाऊन भिमा सहकारी कारखाना संस्थापक कै.मधुकाका शितोळे यांचे कारखान्यातील पुतळयास पुष्पहार अर्पण करणार आहेत.
ज्याअर्थी वाचले क्रमांक २ ते ४ याचे अहवालावरून विद्यमान आमदार व भिमा पाटस सहकारी कारखान्याचे चेअरमन श्री.राहुल कुल यांचा तसेच कारखान्यातील कामगार यांचा मा. खासदार श्री.संजय राऊत यांचे कारखान्यामध्ये भेट व पुतळयास पुष्पहार अर्पन करण्याचे कार्यक्रमास विरोध आहे.
दिनांक २६/०४/२०२३ रोजी श्री संजय राऊत ( मा. खासदार शिवसेना उध्दव ठाकरे गट) मा. श्रीमती सुषमा अंधारे (उपनेते शिवसेना उध्दव ठाकरे गट) व आयोजक कार्यकर्ते हे भिमा पाटस सहकारी साखर कारखाना येथे कै. मधुकाका शितोळे यांचे कारखान्यातील पुतळयास पुष्पहार अर्पण करणेसाठी जाणार असून ते सदर ठिकाणी कारखान्यातील कामगार व इतर विरोधक, सभासद यांचेकडून त्यांना काळे झेंडे, बॅनर, घोषणा अशा पध्दतीने विरोध होऊ शकतो. तसेच मा. खासदार श्री.संजय राऊत यांचे सोबत असणारे सभासद व कारखान्यात उपस्थित असणारे कामगार व इतर सभासद हे समोर येवून वाद विवाद होऊन, भिमा पाटस कारखाना व कारखान्याचे परिसरामधील शांतता भंग होऊन सदर ठिकाणी दंगल माजण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी भिमा सहकारी कारखाना पाटस व कारखाना परिसरात सकाळी ७.०० ते रात्री २३.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नूसार जमाव बंदी आदेश निर्गमीत करणेत यावेत म्हणून या कार्यालयास विनंती केली असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी या ठिकाणी आदेश काढताना, भिमा पाटस कारखाना व कारखान्याच्या परिसरामधील उक्त कारणास्तव शांतता भंग होउन सदर ठिकाणी दंगल माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर परिसरातील सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्या अर्थी, मी मिनाज मुल्ला, उपविभागीय दंडाधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी दौंड/पुरंदर मला फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये भिमा सहकारी कारखाना पाटस व कारखाना परीसरात दि.26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7:00 ते रात्री 23:00 पर्यंत खालील पैकी प्रतिबंधात्मक आदेश देत असल्याचे म्हटले आहे.
आदेशामध्ये पुढील बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
1) भीमा सहकारी कारखाना पाटस व कारखाना परिसरात उक्त कालावधीत जमावबंदी राहील.
2) उक्त बाबतीत कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक इत्यदी समाज माध्यमाव्दारे अफवा, जातीय व्देष पसरवणारे संदेश. खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फोरवर्ड करणार नाहीत. असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोष्ट करणारी व्यक्ती
तसेच ग्रुप ॲडमिनची राहील
3) उक्त ठिकाणीचे हद्दीमध्ये स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय सार्विजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होडींग लावण्यास प्रतिबंध राहील.
सदर आदेशाची अवमानता केल्यास संबंधीत व्यक्ती भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील.