सातारा : सणबूर (ता.पाटण, जि. सातारा) या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावात राहणाऱ्या जाधव कुटुंबातील चौघांचे मृतदेह राहत्या घरी आढळून आले असून त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला असावा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय ६५), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय ४५) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंदुळकोळे, ता. पाटण) अशी या मृतांची नावे असून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी या घटनेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच याचे गूढ उलगडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील सणबूर येथे जाधव कुटुंबातील तिघे आणि त्यांची विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस हे चौघे झोपलेल्या अवस्थेत मृत आढळून आले. त्यांचा मृत्यू कसा झाला हे समजू शकले नसले तरी काही दिवसापासून या कुटुंबातील प्रमुख आनंद जाधव हे आजारी असल्याचे आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरीच ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.
आनंद जाधव हे घरी ऑक्सिजनवर असताना त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी असे चौघेजण रात्रीच्या वेळी देखभाल करण्यासाठी होते. कालपर्यंत या सर्व कुटुंबियांचे त्यांच्या नातेवाईकांशी फोनवर बोलणे सुरू होते मात्र आज सकाळपासून कोणी फोन उचलत नसल्याने अगोदर शेजाऱ्यांनी त्यांना आवाज देऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही कुणी घर उघडत नसल्याने शेवटी दरवाज तोडण्यात आला.
दरवाजा तोडल्यानंतर मात्र सर्वांच्याच पायाखालची वाळूच सरकली. कारण जाधव कुटुंबातील तीन आणि त्यांची विवाहित मुलगी असे चौघेजण अंथूरणावरच मृत अवस्थेत पडल्याचे दिसत होते. या सर्वांनी आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत शंका कुशंका काढल्यात जात असून पोलिसांच्या तपासात पुढील बाबी उघड होणार आहे.