सुधीर गोखले
सातारा : निम्मा जून महिना उलटून गेला तरी पावसाने ओढ दिल्याने राज्यातील बऱ्याच धरणामधील पाणी साठा हा आता काही दिवस पुरेल इतकाच शिल्लक राहिला असून बळीराजाचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधील चित्रही काही फारसे वेगळे नाही महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे सध्या म्हैसाळ टेंभू सारख्या जलसिंचन योजना चालवून बळीराजाच्या शिवारात पाणी खेळत आहे. मात्र धारण साठा आता फक्त ११.७४ टी एम सी इतकाच शिल्लक राहिला आहे त्यामुळे या सिंचन योजनांवर सुद्धा मर्यादा येऊ शकतात त्यातच आता कोयना धरण जलविद्युत प्रकल्पातील सर्वात महत्वाचा चार नंबर टप्पा बंद म्हणजेच सुमारे १००० मे वॉट वीज निर्मिती ठप्प झाली आहे.
कोयना प्रकल्पातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन आणि बिगर सिंचन योजनेसाठी आरक्षित आहे, त्यातच उपसा बंदी आणि पाणीकपातीची सूचना याआधीच झाली असून पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला झळ बसली आहे सध्या धरण पायथा विद्युत गृहातून केवळ १८ मे वॉट विद्युत निर्मिती सुरु आहे. सध्या धरणातून १०५० क्युसेक्स पाणी हे नदीपात्रात सोडले जात आहे. धरणातील ५.१२ टी एम सी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा असतो त्यामुळे सध्या धरणामध्ये केवळ ७.८४ टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे.
नेऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून ने अजून विलंब केला तर भविष्यात संपूर्ण राज्यात विजेबरोबरच पाण्याचेही भीषण संकट ओढवेल यात शंका नाही.