सासवड | दुचाकीवर चाललेल्या दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले, 1 लाख 58 हजारांचा मुद्देमाल घेऊन 3 चोरटे पसार

सासवड : सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात चोरट्यांनी थैमान घातले आहे. दररोज कुठे न कुठे चोरी, घरफोडी आणि वाटमारीचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून यामध्ये दुचाकीवर चाललेल्या दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम,दागदागिने तीन चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत मनोहर भैरू सुर्वे (व्यवसाय नोकरी, रा.गावडदरा ता.हवेली जि. पुणे) यांनी फिर्यादी दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांची पत्नी हे दि. २१/०५/२०२३ रोजी रात्री ९:१५ च्या सुमारास चिव्हेवाडी (ता.पुरंदर) या गावच्या हद्दीत असणाऱ्या चिव्हेवाडी-देवडी रोडवरील बंधाऱ्या जवळुन मोटार सायकलवर नारायणपुरवरून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका होंडा कंपनीच्या मोटारसायकलवर तीन अनोळखी इसम आले आणि त्यांनी फिर्यादी यांच्या मोटारसायकलला गाडी आडवी लावुन
कोयत्याचा धाक दाखवत “पैसे व सोने
काढुन द्या नाहीतर जिवे मारून टाकतो”
असे म्हणुन त्यांच्याकडील
रोख रक्कम तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व डोरले असा १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने
चोरी करून नेला.

चोरी करण्यात आलेल्या ऐवजामध्ये ८ हजार रुपये रोख, १,२०,००० रुपायांचे दोन तोळे वजनाचे गळ्यातील सोन्याचे तीन पदरी गंठण, ३०,००० रुपयांचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र असा १,५८,००० रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे. अधिक तपास सासवड पोलीस करत आहेत.