सरपंच कमालयं ब्वा तुमची..! पठ्ठ्याने अख्खा पुणे जिल्हाच हादरवला.. एक – दोन नव्हे तर थेट 250 गाड्याच केल्या लंपास

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राहणाऱ्या एका सरपंचाने पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सुमारे 250 गाड्या कंपनीत लावण्याच्या आमिषाने स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या लंपास केल्या आहेत.
सागर मोहन साबळे (रा.साबळेवाडी, ता.खेड जि.पुणे) असे या सरपंचाचे नाव आहे. त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर साबळे याने आलिशान गाड्यांच्या वाहन मालकांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून त्याने दौंडमधून 21, खेड मधून 55, पिंपरी चिंचवड मधून 70 आणि इतर भागांतून 105 अश्या सुमारे 250 आलिशान गाड्या स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या परस्पर गहाण ठेवल्याचे आता समोर आले आहे.
सध्या महाठग सरपंच भोसरी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून आत्तापर्यंत 20 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या भामट्या सरपंचाने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण पुणे जिल्ह्याच हादरवून सोडला आहे. भोसरी पोलिसांचा तपास संपताच दौंड, खेड पोलीस त्याची खातीरदारी करण्यासाठी तयार आहेत. कारण त्याने गंडा घातलेल्या लोकांच्या गाड्यांचा तपास या पोलिसांना करायचा आहे.
हा महाठग सरपंच अगोदर लोकांना तुमची गाडी कंपनीत लावतो आणि भाड्याची चांगली रक्कम दर महिन्याला देतो असे आमिष दाखवायचा. त्याच्या आमिषाला भाळून लोक नवीन गाड्या घ्यायचे किंवा ज्यांच्या गाड्या एकदम नवीन असायच्या तेही लोक याच्या भूलथापांना बळी पडून आपल्या गाडीची नोटरी करून त्याच्या ताब्यात गाडी देऊन टाकायचे. हा भामटा चार-पाच महिने भाडे म्हणून त्यांना काही रक्कम द्यायचा आणि नंतर मात्र पुढील पैसे न देता त्या गाड्यांचीच विल्हेवाट लावायचा. हा प्रकार त्याने पुणे जिल्ह्यातील तब्बल 250 वाहन मालकांसोबत केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सध्या हे वाहन मालक आपल्या पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन साहेब काही करा पण आमची तेवढी गाडी मिळवून द्या अशी विनंती करताना दिसत आहेत.