संतोष जगताप ‛खून’ प्रकरणी उद्या होणारे आंदोलन ‛या’ कारणामुळे ‛स्थगित’

पुणे ग्रामीण : उरुळी कांचन येथे संतोष जगताप याच्या खून प्रकरणी अनेक आरोपी निष्पन्न होत असताना यामध्ये खूनातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या उमेश सोनवणे याच्या भावकितील अन्य लोकांवरही कट रचून खून केल्याप्रकरणी कारवाई करावी आणि त्यांना मोक्का लावावा अशी मागणी जगताप कुटुंबीयांनी केली होती. तसेच आरोपींवर कारवाई न केल्यास लोणीकाळभोर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार लोणीकाळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि संतोष जगताप याच्या कुटुंबियांमध्ये झालेल्या चर्चेतून उद्या होणारे आंदोलन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पोलीस तपासात जे जे आरोपी निष्पन्न होत आहेत त्या त्या सर्व आरोपींवर कारवाई सुरू असून यापुढेही जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना सांगितले आहे.

पोलीसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर उद्या लोणीकाळभोर येथे होणारे आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मित्र परिवाराकडून देण्यात आली आहे. संतोष जगताप याच्या खून प्रकरणी आत्तापर्यंत पाच आरोपींवर कारवाई करण्यात आली असून अजून यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.