पुणे ग्रामीण : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे 22 ऑक्टोबर रोजी संतोष जगताप याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. हा खून दौंड तालुक्यातून कट रचून घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
परंतु या खुनातील उमेश सोनवणे हा एकच सूत्रधार पकडण्यात आला असून यातील अन्य पाच जणांवर कारवाई करून त्या सर्वांना ‛मोक्का’ लावण्यात यावा अशी मागणी जगताप कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.
संतोष जगताप याचा खून करणाऱ्या मिसाळ आणि आदलिंगे या दोघांना अगोदर अटक करण्यात आली होती तर खैरे हा घटनास्थळी गोळीबारात ठार झाला होता.
पकडण्यात आलेल्या या दोन आरोपींनी उमेश सोनवणे हा या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे कबुल केल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली होती. या खूनात पिस्तुल पुरविणाऱ्या यादव आणि वाघमोडे या दोघांनाही विविध ठिकाणावरून लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केल्याने या खून प्रकरणातील आरोपींची संख्या ही 5 झाली आहे.
मात्र या खूनाच्या कटात फक्त उमेश सोनवणे याचाच सहभाग नसून त्याच्या भावकितील अन्य पाच जणांचा यात हात असल्याचा आरोप जगताप कुटुंबीयांनी केला असून या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जगताप कुटुंबीयांनी आपल्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
जर यातील अन्य लोकांवर कारवाई झाली नाही तर उद्या दि.8 नोव्हेंबर रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.