पुणे ग्रामीण : उरुळी कांचन येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप (santosh jagtap) याची भर दिवसा झालेली हत्या हि पूर्वनियोजित होती हे आता समोर आले आहे. संतोष जगताप याचा पंधरा दिवसांपूर्वीच गेम होणार होता मात्र दौंडच्या आमदार राहुल कुल (rahul kool) तो प्रयत्न फसला होता हे आता पुढे येत आहे.
न्हावरा ता.शिरूर येथे दि.5 ऑक्टोबर रोजी एका हॉटेल चे उदघाटन होते. त्या उदघाटनाला वाळू व्यावसायिक संतोष जगताप यालाही निमंत्रण होते. त्यामुळे तो या हॉटेलच्या उदघाटनासाठी न्हावरा येथे जात असताना त्याच्या खुनातील आरोपींनी त्याला तेथेच मारण्याचा प्लॅन आखला होता. संतोष हा गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यावर हल्ला करायचा आणि तेथून पोबारा करायचा असा हा संपूर्ण प्लॅन होता. या प्लॅन नुसार संतोष जगताप चा आरोपींनी पाठलागही सुरू केला आणि उद्घाटन स्थळी फिल्डिंगही लावली मात्र त्याचवेळी तेथे काहीवेळाने दौंडचे आमदार ‛राहुल कुल’ यांची गाडी आली आणि त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते आणि गोळीबार होताना उडणारा गोंधळ आणि त्यातून पळ काढताना येणारी अडचण लक्षात घेऊन आरोपींना हातात आलेली गेम सोडून द्यावी लागली होती. त्या दिवशी आमदार राहुल कुल तेथे नसते तर संतोषची हत्या तेथे करण्याचा प्लॅन आरोपींचा होता हे आता समोर येत आहे. संतोष जगताप याला खडकी रावणगाव येथेही मारण्याचा प्लॅन करण्यात आला होता मात्र तेथेही तो प्लॅन फसला होता.
संतोष जगताप हा सोनवणे बंधूंच्या हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आला होता. त्याच्या घरची पार्श्वभूमी राजकीय होती त्यामुळे त्याने खुनाचा डाग पुसून लोकांमधून कसा नावलौकिक मिळवता येईल याचा तो प्रयत्न करत होता मात्र, दोन खून आणि आप्पा लोंढे या सोबत नाव जोडले गेल्याने त्यात तो अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल. जीवाला धोका आहे हे माहीत असतानाही तो गुन्हेगारांसारखा चाणाक्ष न राहता सर्वसामान्य लोकांसारखा सहजरित्या वावरत होता. हा त्याचा अति आत्मविश्वास त्याला नडला हे नाकारून जमणार नाही.
शेवटी गुन्हेगारीचा शेवट हा भयानक असतो हे आपण वेळोवेळी ऐकत आणि पाहत असतो तसाच प्रकार हा संतोष सोबत घडला यात शंका नाही. स्वतःला या गुन्हेगारीपासून वेगळे दाखविण्यासाठी त्याने वेगवेगळे प्रयोग केले मात्र शेवटी एका टोळीने टोळी युद्ध म्हणा, किंवा सुपारी घेऊन म्हणा..! (पोलीस तपासात हे लवकरच सिद्ध होईल) त्याचा गेम झालाच हे गुन्हेगारी विश्वाचे चालत आलेले कटू सत्य आहे.