‘त्या’चे वास्तव्य चांदोली पासून दांडेली अभयारण्यापर्यंत

सुधीर गोखले
सांगली : वाघोबा म्हणले की, लहानथोरांचे डोळे एकदम विस्फारले जातात सध्या वाघोबा चे दर्शन आपण फक्त एखाद्या गोष्टीच्या पुस्तकात किंवा दूरचित्रवाणी वरील एखाद्या चॅनल वर घेतो मात्र, आता या वाघोबाचे प्रत्यक्ष दर्शन चांदोली अभयारण्यात होत आहे. होय नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वनविभागातर्फे एका सर्वेक्षणासाठी लावलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघाने दर्शन दिले आणि वनप्रेमी सुखावले असून चांदोली अभयारण्यामध्ये परत एकदा वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे.

या पट्टेरी वाघांसाठी निर्माण केला गेलेला कोअर झोन सुद्धा सुरक्षित असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे मध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या नव्याने वाघ या जंगलामध्ये सोडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाहीर झाल्यावर टायगर ऑथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यात पाच वाघांचे अस्तित्व आढळून आले होते. तसेच या चांदोली पासून दंडेली अभयारण्य हा जवळ जवळ  २०० किमी चा पट्टा पसरलेला आहे या पट्ट्यामध्ये या वाघांचा प्रवास होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आल्याने या वाघांची भ्रमंती हि एव्हड्या मोठ्या परिघामध्ये होत असल्याची खात्री वन्यजीव अभ्यासकांना झाली.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघोबांचे वास्तव्य हे सुरक्षित मानले गेल्याने शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ताडोबा अभयारण्यातून आणण्यात येणारे वाघ हे देखील सुरक्षित अधिवासात मुक्त संचार करू शकतील यात शंका नाही. वन्यविभाग आणि वन्यजीव अभ्यासकांच्या मते एक गमतीशीर गोष्ट अशी कि प्रत्येक वाघाचे पट्टे हे एक सारखे नसतात तर त्यात बदल असतो त्यावरून हे स्पष्ट होते कि एकच वाघ सगळीकडे आढळतो असे नाही. तसेच त्यांचे डोळे पायाचे पंजे यातही फरक असतो.