Sangli Robbery | सांगलीतील ‘रिलायन्स’ वर 14 कोटींचा दरोडा, दरोड्यातील चारचाकी वाहन ‘भोसे’ जवळ आढळले

सुधीर गोखले

सांगली : सांगली मिरज रस्त्यावरील ‘रिलायन्स ज्वेल’ या सराफी शोरूमवर भर दिवसा  सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यावेळी आठ ते दहा दरोडेखोरांनी शोरूम मधील कर्मचाऱ्यांना बांधून ठेऊन हवेत गोळीबार करत सोन्या चांदीचे दागिने आणि हिऱ्यांची लूट केली होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी २२ किलो वजनाचे १४ कोटींचे सोने, हिऱ्यांचे दागिने, ४४ हजार ३०० रुपयांची रोकड, दोन मोबाईल असा १४ कोटी ६९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेनंतर दरोडेखोर पसार झाले तर दरोडेखोरांनी वापरलेली चारचाकी क्रमांक (एम एच ०४ इटी ८८३४) मिरज जवळील भोसे गावाजवळ निर्जन ठिकाणी बेवारस स्थितीत आढळून आली आहे. या गाडीमध्ये दरोड्यावेळी वापरलेले रिव्हॉल्वर गावठी कट्टा आणि सात जिवंत काडतुसे तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. या दरोड्याची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानी घेतली असून राज्याबरोबरच राष्ट्रीय तपास यंत्रणा हि या दरोडेखारांच्या मागावर आहेत. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या शोरूम ला भेट देऊन कर्मचाऱ्यांची चौकशी केली यावेळी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख डॉ बसवराज तेली मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते  यावेळी श्री फुलारी यांनी सहकारनामा न्यूज नेटवर्क शी बोलताना सांगितले कि या घटनेमधून पोलीस दल नक्कीच बोध घेईल या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून तपास यंत्रणा गतिमान करण्यात आल्या आहेत.

पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरेही हाती लागले असून सीसी टीव्ही फुटेज च्या मदतीने दरोडेखोरांची शोध मोहीम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सांगली सह कोल्हापूर सातारा पुणे सह राज्यभरातील एल सी बी पथके तपासासाठी दाखल झाली आहेत.