Sangali | वसंतदादा बँकेतील घोटाळ्याची लवकरच वसुलीची शक्यता, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप चे अनेक दिग्गज रडारवर

सुधीर गोखले

सांगली: अवसायनात निघालेली सांगली जिल्ह्यातील वसंतदादा सहकारी बँकमधील तब्बल २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यापूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी सहकार विभागाला अहवाल सादर केला होता यासंदर्भात आज सहकार विभागाने हिरवा कंदील दाखवल्याने वसुलीच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून संबंधित व्यक्ती, संस्थेला नोटीस काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप चे अनेक दिग्गज सध्या रडारवर असून त्यांच्यावर सुद्धा नोटीस निघणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बँकेचे चौकशी अधिकारी आर.डी. रौनक यांच्या मार्फत या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. तब्बल २७ माजी संचालक आणि दोन अधिकाऱ्यांच्या जवळजवळ १०१ मालमत्तावर बोजा चढवण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. मात्र पुणे येथील न्यायाधिकरणाने हे आदेश अंशतः रद्द केले होते. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी उर्वरित कामकाज पूर्ण करून दोन महिन्यांपूर्वी त्याचा अहवाल सहकार विभागाला सादर केला होता. यामध्ये संबंधित माजी संचालक आणि अधिकारी यांच्यावर घोटाळ्यातील रकमांची जबाबदारी निश्चित केली आहे त्यानुसार वसुलीची शिफारसही करण्यात आली आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या शिफारशी नुसार सहकार विभागाने वसुलीस हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे अवसायकांकडून पाऊले उचलली जात आहेत रकमांची जबाबदारी निश्चित केलेल्या व्यक्तींना नोटिसा काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

बँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणी मे २०२२ पासून चौकशी पुन्हा गतीने सुरु झाली या चौकशीचा अहवाल दोन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला. घोटाळ्याच्या आरोपात २७ माजी संचालक तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे
संचालकांना अपील करण्याची संधी
ज्यांच्या कडून घोटाळ्याच्या रकमेची वसुली केली जाणार आहे. अशा माजी संचालकांना अपील करण्याची संधी आहे परंतु अद्याप कोणत्याही माजी संचालकांनी अपील सादर केले नाही. त्यामुळे सहकार विभाग कोणती पाऊले उचलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.