Sahkarnama News Impact : ‛सहकारनामा’ ची बातमी लागताच कोरोना ‛लस’ झाली दौंडमध्ये दाखल, उद्यापासून कोरोना ‛लसीकरणाला’ पुन्हा सुरुवात



– सहकारनामा

दौंड : दौंड तालुक्यामध्ये लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती होऊन ते लसीकरण करण्यास तयार असताना अचानक लसींचा तुटवडा होऊन काल दुपारनंतर लसीकरण थांबले होते. 



त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचा हिरमोड होऊन त्यांना घरी परतावे लागले होते, तर आजही तशीच परिस्थिती असल्याने लसीकरणाचे कॅम्प बंद ठेवावे लागले होते.

हि बाब बातमीच्या माध्यमातून ‛सहकारनामा’ ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत लसीकरणाच्या तुटवड्याबाबत  नागरिकांची नाराजी समोर आणली होती. 

या बातमी नंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी दौंड तालुक्याची मागणी आणि गरज ओळखून   पुन्हा दौंड तालुक्यासाठी लसींचा नवीन स्टॉक पाठवून देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर अंमल करत आज सायंकाळी पुन्हा लसींचा स्टॉक दौंड तालुक्यात दाखलही झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी सहकारनामा शी बोलताना दिली आहे.

त्यामुळे उद्यापासून पुन्हा दौंड तालुक्यात लसीकरणाला सुरुवात होत असून नागरिकांनी याचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.