sahkarnama news effect – ‛सहकारनामा’च्या बातमीचा दणका.. दौंड शहरातील नगरपालिकेची महात्मा फुले भाजी मंडई झाली पुन्हा चकाचक



दौंड : दौंड नगर पालिकेने वैशिष्टयपूर्ण

निधीतून जवळपास दोन कोटी रुपये खर्च करीत येथील महात्मा फुले भाजी मंडईचे बांधकाम केले आहे. परंतु मागील दीड वर्षापासून या मंडईचा वापर भाजी विक्रेते व गाळेधारक करीत नसल्याने मंडईची अत्यंत दुरवस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य तयार झाले होते. मंडईचा ताबा येथील दारुड्यांनी घेऊन आपल्या हक्काचा अड्डा बनविला आहे अशा आशयाची बातमी ‛सहकारनामा’ ने प्रसिद्ध केली होती. याचा पाठपुरावा आमच्या प्रतिनिधीने करत याबाबत नगराध्यक्ष शितल कटारिया व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बादशहा शेख यांना मंडईच्या दुरवस्थेबाबत बातमीच्या माध्यमातून चांगलेच धारेवर धरले होते.  

या बातमीची या दोघांनीही तत्परतेने दखल घेत नगरपालिकेतील संबंधित विभागाला भाजी मंडई सफाईची सूचना केल्याने याचा परिणाम लागलीच दिसून येत आहे.

दि.1 ऑक्टोबर रोजी नगरपालिका, आरोग्य विभागाचे निरीक्षक शाहू पाटील यांनी आपल्या टीम कडून संपूर्ण भाजी मंडई ची पूर्णपणे स्वच्छता करून घेतली आहे. तसेच आठवडा बाजारात व रस्त्यावर आपली दुकाने मांडणाऱ्या भाजी पाला विक्रेत्यांनी पुन्हा महात्मा फुले भाजी मंडईत आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नगरपालिकेने आवाहनही केले आहे. 

नगराध्यक्ष शितल कटारिया, गटनेते बादशाह शेख व नगरपालिका प्रशासन यांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्वांनीच स्वागत करीत त्यांचे आभार मानले आहेत.

रात्रीच्या वेळेस येथील दारुड्यांनी पुन्हा या मंडईत आपला अड्डा बनवू नये यासाठी सकाळी व रात्रपाळीसाठी या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड ची नेमणूकही करणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे कोट्यावधी रूपये खर्च करूनही विनावापरात असलेली महात्मा फुले भाजी मंडई पुन्हा एकदा पूर्वी सारखीच सुरू होणार व घाणीचा तसेच दारुड्यांचा स्थानिकांना होणारा त्रासही आता थांबणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.