Sahkarnama effect – “सहकारनामा”चा दणका… दौंड मध्ये बियर बार मालकाने नगरपालिकेच्या जागेत केलेले अतिक्रमण स्वतःहून काढले



|सहकारनामा|

दौंड : दौंड -गोपाळवाडी रोड परिसरातील सावंत नगर येथे दौंड नगरपालिकेच्या मालकीच्या जागेमध्ये येथील एका बियर बार मालकाने अतिक्रमण केले होते.



 सामान्य माणसांची अतिक्रमणे पाडणारी नगरपालिका या धनाढ्य बियर बार मालकाचे अतिक्रमण का पाडत नाही म्हणून ‛सहकारनामा’ ने आवाज उठविला होता. त्याचा परिणाम म्हणजे आज या बियर बार मालकांनी स्वतःहून सदरचे अतिक्रमण काढले असल्याचे चित्र दिसते आहे. 



दौंड नगरपालिकेने या बियर बार मालकाला ना हरकत दाखला दिला तसेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊन सहकार्य केले, तरीही या मालकाने नगरपालिकेच्याच जागेत अतिक्रमण केले आहे हे निदर्शनास येत होते. त्यामुळे या प्रभागाचे(क्र.10) नगरसेवक जीवराज पवार यांनी सदरच्या अतिक्रमणा बाबत नगरपालिकेकडे तक्रार करून ते काढण्याची मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करित तब्बल अडीच महिने नगरपालिकेने अतिक्रमणावर काहीच कारवाई केलेली नाही ही बाबही ‛सरकारनामा’ ने जनतेसमोर आणली होती.



हे पाहून नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस, मित्र पक्षाचे गटनेते बादशहा शेख व इतर नगरसेवकांनी नगरपालिकेला इशारा दिला होता की सदरचे अतिक्रमण निघाले नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून नगरपालिकेचे कामकाज बंद पाडू.



नगरपालिकेने  दि.24 जून रोजी अभय चंद्रमोहन सावंत व इतर यांना सदरच्या अतिक्रमणा बाबत नोटीस काढून ते स्वतःहून काढण्या बाबतची सूचना केलेली होती, अन्यथा नगरपालिकेस कारवाई करणे भाग पडेल असा इशाराही दिला होता. तरीही संबंधितांनी अतिक्रमण काढलेले नाही हे दिसून येत असल्याने या विरोधात ‛सहकारनामा’ ने आवाज उठवित अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा केला होता, आज अखेर सदरचे अतिक्रमण निघून नगरपालिकेची जागा मोकळी झाली असल्याचे पहायला मिळत आहे.