पुणे : राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असतात असे वादग्रत वक्तव्य सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केल्याने पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत हे पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. त्यावेळी आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर हे व्यासपीठावर असताना सदाभाऊ खोत यांनी राज्यकर्त्यांची तुलना रेड्याशी केली तसेच राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद आहेत असे वादग्रस्त विधान करून, जसे पाठीवर हात ठेवल्याशिवाय रेडे बोलत नाहीत त्याचप्रमाणे राज्यकर्तेही बोलत नाही असा टोला सदाभाऊ खोत यांनी राज्यकर्त्यांना लगावला. जिकडे जास्त डोकी तिकडेच राज्यकर्ते बोलतात, आणि तिथं नको ते बोलून जातात असे म्हणत सदाभाऊ खोतांनी राज्यकर्त्यांना चिमटा काढला. पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे विधान केलंय.
पुण्यात विध्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत बोलत होते. त्यावेळी या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार अभिमन्यू पवार हे उपस्थित असताना त्यांनी हे विधान केल्याने राजकीय व्यासपीठावर एकच खसखस पिकली.
सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात मुख्य मुद्दा हा भ्रष्टाचाराचा ठेवत, भ्रष्टाचार कसा संपेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं आणि सरकार कुणाचेही असले तरी भ्रष्टाचार होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त करताना अभ्यास करणारे विद्यार्थी मागे राहतात आणि पैसे देणारे विद्यार्थी पुढे जातात असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.