Sad News : दौंड चे ज्येष्ठ पत्रकार कुमार ठाकोर यांचे निधन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

पाच दशके पत्रकारितेत कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार ठाकोर (वय ७७) यांचे शुक्रवारी (ता. २५) रात्री अल्प आजाराने दौंड येथे निधन झाले. सार्वजनिक आयुष्यात मितभाषी पण तत्त्वांचे आग्रही अशी ओळख असलेल्या ठाकोरांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

‘भीमातीर समाचार’ या दौंड तालुक्यातील पहिल्या साप्ताहिकाच्या संपादकपदाची सूत्रे आपल्या वडिलांच्या पश्चात त्यांनी घेतली व चार दक्षकांहूनही अधिक काळ ते नियमितपणे चालवले. 

दौंडमधून पहिला दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे श्रेयही त्यांनाच आहे. मोठा काळ त्यांनी चालवलेल्या ‘विक्रम प्रिंटर्स’च्या माध्यमातून तालुक्याच्या मुद्रण क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.

पत्रकारितेच्या निमित्ताने शहराच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने काम करत असतानाच त्यांनी आपली साहित्य व सांस्कृतिक विषयक आवडही क्रियाशील राहून जोपासली. 

शहर व तालुक्यातील उदयोन्मुख लेखक-कवींना एकत्र आणत त्यांनी ‘साहित्य मंडळा’ची स्थापना केली होती, ‘रचना’ संस्थेच्या वाटचालीच्या आरंभीच्या काळातील त्यांचे योगदानही महत्त्वाचे होते. शहरातील सार्वजनिक कार्यातही त्यांचा सहभाग असे.